शहापूर-पाडसे ते झाडी शिरसाळे रस्त्यास मिळाली प्रशासकीय मान्यता.. आ.अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने साडेसात कोटींचा निधी,धुळे रस्त्यास जोडणारा शॉर्टकट मार्ग होणार तयार…

अमळनेर (प्रतिनिधि) ग्रामिण भागाचे दळणवळण वाढावे यासाठी नव्या रस्त्यांच्या निर्मितीचे यशस्वी प्रयत्न आमदार अनिल भाईदास पाटील यांचे सुरू असंताना नुकतीच शहापूर-सबगव्हान पाडसे ते झाडी शिरसाळे पर्यंत जवळपास 9.140 किमी रस्त्यासाठी 750.25 लक्ष रुपयांचा निधी नुकताच मंजूर करण्यात आला आहे.
शहापूर कडील गावांना धुळे रस्त्याला जोडण्यासाठी नवा शॉर्टकट मार्ग हा तयार होणार असल्याने हा मार्ग ग्रामिण जनतेसाठी वरदान ठरणार आहे.सदर रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत होणार असून दि.1 फेब्रुवारी रोजी याबाबतचा शासन निर्णय प्रकाशित होऊन प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. या रस्त्यामध्ये समाविष्ट प्रत्येक गावांच्या हद्दीत कॉंक्रीटीकरण केले जाईल तसेच लहान नाल्यावर पुलांचे व संरक्षण भिंतीचे बांधकाम देखील करण्यात येईल. सदर रस्ता हा सद्यस्थितीत जेमतेम असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून हा मार्ग व्हावा अशी मागणी होत होती.कारण शहापूर,तांदळी,पाडसे,सबगव्हान,भोरटेक, चौबारी, जैतपीर आदी अनेक गावांतील लोकांना धुळे,फागणे, नवलनगर किंवा त्या मार्गाकडे जायचे म्हटल्यास अमळनेर मार्गे फेऱ्याने जावे लागत असे त्यामुळे झाडी शिरसाळे कडून शॉर्टकट मार्ग व्हावा असा अशी अनेक वर्षापासूनची मागणी होती ती पूर्ण होत नसल्याने प्रवाश्यांना नाईलाजाने अमळनेर मार्गे किंवा आहे त्याच खराब रस्त्याचा वापर करात शॉर्टकट जावे लागत होते,आमदार अनिल पाटील यांनी या मार्गाचा प्रश्न मनावर घेऊन त्यास निधीची मंजुरी मिळवून आणल्याने मोठा प्रश्न त्यांनी सोडविला आहे.
असा असेल हा नवीन शॉर्टकट मार्ग
शहापूर परिसरातील लोकांना धुळे रस्त्याकडे किंवा नवलनगर, फागणे,धुळे कडे जायचे म्हटल्यास ते या नवीन मार्गाचा वापर करून शिरसाळे पर्यंत येतील तेथून वावडे पर्यंत देखील रस्ता चांगला असून वावडे पासून धुळे रस्त्याला जोडणाराही चांगला रस्ता आहे.म्हणजे शहापूर कडील प्रवासी अवघ्या 20 किमीचा प्रवास करून धुळे रस्त्यावर पोहचू शकणार आहे,धुळे रस्त्याकडून शहापुर परिसरात जाणाऱ्या लोकांना देखील या रस्त्याचा फायदा होणार आहे,यामुळे जवळपास 20 किमी पेक्षा अधिकचा फेरा वाचून वेळेची देखील बचत होणार आहे.
आमदार अनिल भाईदास पाटील यांनी मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस,विरोधीपक्ष नेते ना अजित पवार ग्रामविकासमंत्री ना गिरीश महाजन,जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील,तत्कालीन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून या गेल्या अनेक वर्षांची मागणी असलेल्या रस्त्याला मंजुरी मिळून निधी प्राप्त केला आहे. लवकरच सदर कामाची निविदाप्रक्रीया होऊन प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल, तसेच सदर रस्त्याची देखभाल ही 5 वर्ष सबंधित ठेकदाराकडेच राहणार असल्याने किमान 5 वर्ष या रस्त्याचा दुरुस्तीसह प्रश्न मार्गी लागला आहे.
अमळनेर मतदारसंघात ग्रामिण जनतेचे दळणवळण वाढविण्याचा आमदार अनिल पाटील यांचा हा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद असून लवकरच अजून नवीन मार्गांना देखील मंजुरी मिळेल असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला करत या रस्त्याच्या मंजुरीबद्दलक मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,विरोधीपक्ष नेते ग्रामविकासमंत्री, पालकमंत्री व राज्य शासनाचे आभार व्यक्त केले आहेत.