पालकांच्या परवानगी शिवाय सोशल मीडियाचा वापर नाही. . -१८ वर्षांखालील मुला-मुलींसाठी केंद्र सरकार करणार नवा कायदा..

24 प्राईम न्यूज 5 Jan 2024
केंद्र सरकार आता लवकरच लहान मुलांच्या सोशल मीडिया वापरावर कायदा आणणार आहे. १८ वर्षांखालील मुला-मुलींना आता सोशल मीडियाच्या वापरासाठी पालकांची परवानगी आवश्यक करण्याबाबत केंद्र सरकार कायदा करणार आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती प्रसारण मंत्रालयाने व्यक्तिगत डिजिटल संरक्षण अधिनियमाचा मसुदा सादर केला असून यावर १८ फेब्रुवारीपर्यंत सूचना नोंदविण्याची मुदत देण्यात आली आहे. या सूचनांच्या आधारावर या कायद्यामध्ये बदल केला जाईल अन्यथा हाच प्रस्ताव कायम ठेवण्यात येईल, असे समजते.कायद्यानुसार १८ वर्षांपेक्षा लहान मुलांना सोशल मीडिया अकाऊंट सुरु करण्यासाठी आई-वडिलांची परवानगी आवश्यक असणार आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास दंड प्रस्तावित करण्यात आला आहे. मसुद्यात ई-कॉमर्स साईट, ऑनलाईन गेमिंग आणि सोशल मीडिया साईट्स यांच्या प्रत्येकाची वेगवेगळी व्याख्या करण्यात आली आहे. प्रत्येकासाठी वेगळी नियमावली तयार करण्यात आली आहे. सोशल मीडियाचा वापर अल्पवयीन मुलांमध्येही वाढल्यामुळे त्याचे दुष्पपरिणाम दिसून येत आहेत. लहान मुले पालकांच्या नकळत सोशल मीडिया वापरत असल्यामुळे यातून अनेक गुन्हे घडल्याचे समोर आलेले आहे आणि म्हणून हा कायदा महत्त्वाचा ठरणार आहे.