अमळनेरमध्ये प्रशासनाच्या सतर्कतेने थांबवला बालविवाह..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर येथील बोरसे गल्लीतील एका १७ वर्षीय मुलीचा बालविवाह प्रशासनाच्या सतर्कतेमुळे रोखण्यात आला आहे. नाशिकच्या भावेश सुभाष पाटील या तरुणाशी तिचा विवाह ठरवण्यात आला होता. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करून ही कारवाई केली उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे, नायब तहसीलदार प्रशांत धमके, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी प्रेमलता पाटील आणि संरक्षण अधिकारी योगिता चौधरी यांनी घटनास्थळी जाऊन विवाह थांबवला. मुलीच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावरून तिचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्याचे सिद्ध झाले मुलीच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून स्पष्ट करण्यात आले की, मुलगी १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत तिचे लग्न करता येणार नाही. यासंदर्भात त्यांना लेखी ताकीद देण्यात आली आहे. मुलगी आणि तिचे पालक यांना बाल कल्याण समितीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, मुलीला बालसुधार गृहात पाठवण्याची तयारी सुरू आहे प्रशासनाच्या सतर्कतेमुळे आणि त्वरित कारवाईमुळे हा बालविवाह रोखण्यात यश आले आहे.