भुसावळ येथे 20,000 रुपयांची लाच घेताना उपकार्यकारी अभियंता रंगेहाथ पकडले..

24 प्राईम न्यूज 23 Jan 2025.
भुसावळ: जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आज भुसावळ येथे यशस्वी सापळा रचत उपकार्यकारी अभियंता प्रशांत प्रभाकर इंगळे यांना 20,000 रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. तक्रारदाराने दिलेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
तक्रारदार हे शासकीय विद्युत ठेकेदार असून, त्यांनी एका खाजगी कंपनीचा नवीन सर्व्हिस कनेक्शन क्षमतावाढीचा प्रस्ताव (100 वॅटवरून 200 वॅट) म.रा.वि.वि कंपनीच्या भुसावळ कार्यालयात सादर केला होता. हा प्रस्ताव पुढे पाठविण्यासाठी आरोपी अभियंता प्रशांत इंगळे यांनी 25,000 रुपयांची मागणी केली. तडजोडीनंतर ही रक्कम 20,000 रुपयांवर निश्चित झाली.
तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे याबाबत तक्रार दाखल केली. तक्रारीची शहानिशा करण्यात आली असता आरोपीने लाच मागणीस दुजोरा दिला. आज (22 जानेवारी 2025) सापळा रचून आरोपीकडून 20,000 रुपयांची रक्कम स्वीकारताना त्याला पकडण्यात आले.
आरोपीविरुद्ध भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तक्रारदाराचा प्रलंबित प्रस्ताव आरोपीच्या टेबलवरून हस्तगत करण्यात आला असून त्याचा तपास सुरू आहे पर्यवेक्षण अधिकारी: श्री. योगेश ठाकूर, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव
तपास अधिकारी आणि सापळा अधिकारी: श्रीमती स्मिता नवघरे, पोलीस निरीक्षक, जळगाव
सापळा पथकाचे सदस्य: पोना बाळू मराठे, पोकॉ अमोल सूर्यवंशी
सर्व नागरिकांना आवाहन:
शासकीय कामकाजासाठी कोणत्याही अधिकारी/कर्मचाऱ्यांकडून किंवा त्यांच्या वतीने लाचेची मागणी झाल्यास तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे संपर्क साधावा.