धार येथील मंदिर ते पिर बाबा दरगाह रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर धार गावातील सुप्रसिद्ध हजरत अब्दुल रज्जाक शाह पिर बाबा दरगाहकडे जाणारा मुख्य रस्ता अत्यंत खराब अवस्थेत आहे. मंदिरापासून दरगाहपर्यंत जाणाऱ्या या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, धूळ व मातीमुळे वाहनचालक तसेच पायी प्रवास करणाऱ्या भाविकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
दरवर्षी हिंदू आणि मुस्लीम भाविक मोठ्या संख्येने या पवित्र स्थळी दर्शनासाठी येतात. मात्र, खराब रस्ता आणि खड्ड्यांमुळे प्रवास करताना भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी ही परिस्थिती अधिक त्रासदायक ठरत आहे.
ग्रामस्थांनी या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला असून, नुकतेच त्यांनी आमदार अनिल पाटील यांना निवेदन दिले आहे. या निवेदनाद्वारे ग्रामस्थ व भाविकांनी रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करून रस्ता सुस्थितीत आणण्याची मागणी केली आहे.
निवेदन देताना अजरोद्दीन नजमोद्दीन मुजावर, पठाण शाहरुख, नईम, पठाण, शोएब सय्यद, मोहसिन, मेवाती, रिजवान मणियार, वाजिद मेवाती ,समीर शेख, आदी उपस्थित होते.