मालमत्ता कर वसुलीसाठी नगरपालिका प्रशासन सज्ज..

पालिकेची थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम; ८ पथकांची नियुक्ती
आबिद शेख/अमळनेर. नगरपालिकेने 2024-25 या आर्थिक वर्षातील थकीत मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि घरपट्टी वसूल करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. यासाठी 8 पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, वसुली प्रक्रियेला गती देण्यात आली आहे.
पालिकेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, थकबाकी टाळण्यासाठी आणि जप्तीच्या कारवाईपासून बचाव करण्यासाठी थकीत रक्कम तत्काळ भरावी. कर वेळेवर न भरल्यास मालमत्ता जप्ती, नळ कनेक्शन खंडित करणे, तसेच थकबाकीदारांची नावे चौकात फलकावर लावणे आणि वर्तमानपत्रात प्रसिद्ध करणे अशा कठोर कारवायांसाठी प्रशासन सज्ज आहे.
दंडाची तरतूद:
- थकबाकी भरताना दर महिन्याला 2% दंड आकारला जाईल.
- मुदतीत कर न भरल्यास मालमत्तेवर नगरपरिषदेचा बोजा चढवला जाणार आहे.
पालिकेने स्पष्ट केले आहे की, थकबाकीदारांना नोटीस दिल्यानंतरही भरणा न केल्यास जप्तीचे आदेश दिले जातील. यासाठी नागरिकांनी घरपट्टी, पाणीपट्टी, आणि इतर थकीत कर त्वरित भरून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
वसुलीसाठी नेमलेल्या पथकांनी मोहीम सुरू केली असून, नागरिकांनी कर वेळेत भरून प्रशासनाला सहकार्य करावे, असेही नेरकर यांनी सांगितले आहे.