सिंधी कॉलनीतील रोडची दुरावस्था, नागरिकांची दुरुस्तीची मागणी..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर सिंधी कॉलनी येथील (चोपडा रोड, गट नं. ४००) अंडरग्राउंड पाईपलाईन टाकल्यानंतर पूर्णतः खराब झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्त्यावरील खड्डे, धूळ, तसेच घाण यामुळे या परिसरातील रहिवासींना दैनंदिन जीवनात अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या रस्त्यामुळे वाहतूक अडथळित झाली आहे, अपघातांचे प्रमाण वाढले आहे आणि परिसरात डास व मच्छरांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे, त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
परिसरातील रहिवाशांनी या समस्येवर तात्काळ तोडगा काढण्यासाठी रस्ता सिमेंट काँक्रीटने तयार करण्याची मागणी केली आहे. तसेच रस्त्याची स्वच्छता आणि व्यवस्थापन करण्यासाठी संबंधित प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, अशी विनंतीही केली आहे.
या मागणीसाठी रविकुमार अंदानी, राम मलकानी, भारत सासनानी, मनोज धर्माणी,संजय मलकानी,संजय हिंदुजा,राजू मलकाणी,लक्ष्मण बजाज, आदींसह स्थानिक रहिवाशांनी एकत्र येऊन प्रशासनाकडे अर्ज सादर केला आहे. या समस्येवर लवकरात लवकर तोडगा निघाल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.