गाव पातळीवरील माहितीने प्रशासनाला मिळते बळ – माजी मंत्री अनिल पाटील -मारवड येथे पोलीस पाटील दिनानिमित्त जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न…

आबिद शेख/अमळनेर
गावागावातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस पाटील हे महसूल व पोलीस प्रशासनाचा महत्वाचा दुवा ठरत आहेत. शासनाने पोलीस पाटील या पदाची निर्मिती याच उद्देशाने केली असून, पोलीस पाटलांच्या माहितीच्या आधारे प्रशासकीय कार्यात मोठी मदत होते. गावपातळीवर शांतता आणि सुरक्षितता राखण्याच्या दृष्टीने पोलीस पाटलांची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आणि आमदार अनिल पाटील यांनी केले.
मारवड येथे 24 जानेवारी रोजी आयोजित पोलीस पाटील दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील पोलीस पाटलांसाठी आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यशाळेत आपत्ती व्यवस्थापन आणि नवीन तीन फौजदारी कायदे – भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी सुरक्षा संहिता, आणि भारतीय साक्ष कायदा याविषयी माहिती देण्यात आली.
पोलीस पाटील हे कायदा अंमलबजावणीतील महत्त्वाचा आधार
प्रांताधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा व त्यातील सुधारित तरतुदींच्या अंमलबजावणीत पोलीस पाटलांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमात प्रशासनाच्या कार्यात विशेष योगदान देणाऱ्या पोलीस पाटलांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.
पोलीस पाटील दिनाचे आयोजन
दरवर्षीप्रमाणे यंदाही मारवड पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस पाटील दिन साजरा करण्यात आला. या वेळी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी पोलीस पाटलांनी प्रशासनाला नेहमीच सहकार्य केले असून, भविष्यातही सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील यांनी गुन्हेगारी नियंत्रणासाठी पोलीस पाटलांचे सहकार्य कसे उपयुक्त ठरते हे सांगितले.
कार्यक्रमास खासदार स्मिता वाघ यांनीही हजेरी लावून पोलीस पाटलांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शांतता समितीचे सदस्य, पोलीस अधिकारी, पत्रकार, व विविध विभागांचे पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील अनेक पोलीस पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सामूहिक योगदान
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश भामरे यांनी केले, तर प्रास्ताविक दत्तात्रय ठाकरे यांनी केले. आभार प्रदर्शन भाऊसाहेब पाटील यांनी मानले. यावेळी पोलीस पाटील दिनाचे महत्त्व शांतता समितीचे सदस्य वसंतराव पाटील यांनी विषद केले, तर महिला पोलीस पाटील वसुंधरा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मारवड पोलीस पाटील मित्र परिवाराने विशेष परिश्रम घेतले.