अमळनेर पोलिसांचा लोकाभिमुख उपक्रम: तक्रार निवारण दिनात ११९ प्रकरणे निकाली..

आबिद शेख/अमळनेर. अमळनेर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसांच्या सात कलमी कृती आराखड्याच्या अनुषंगाने अमळनेर पोलीस स्टेशनतर्फे तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले. या विशेष उपक्रमात जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या उपस्थितीत एकूण २०५ अर्जांपैकी ११९ अर्ज निकाली काढण्यात आले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी जनतेच्या हितासाठी पोलीस प्रशासनाला दिलेल्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यात गुन्हे निपटारा, स्वच्छ पोलीस स्टेशन, नागरिकांना वेळेत न्याय, पोलीस कर्मचारी तणावमुक्ती, नागरिक व पोलीस यांच्यातील संबंध सुधारणा आणि अद्ययावत दप्तर यासारख्या महत्त्वपूर्ण बाबींवर भर देण्यात आला आहे.
तक्रार निवारण दिनाच्या निमित्ताने जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, डीवायएसपी आबासाहेब घोलप, पोलीस निरीक्षक विकास देवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, नामदेव ती आणि इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तक्रारदार व प्रतिवादी यांच्यातील वाद ऐकून योग्य निर्णय घेण्यात आले.
या उपक्रमामुळे कौटुंबिक वाद, जमिनीचे वाद, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि अन्यायकारक प्रकरणांचा तत्काळ निपटारा होऊन नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास वाढला आहे.