जवखेडे येथे माता-पालक मेळावा आणि हळदी-कुंकू सोहळा उत्साहात संपन्न

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर: तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जवखेडे येथे माता-पालक मेळावा आणि हळदी-कुंकू सोहळा मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा कविता प्रफुल्ल पाटील होत्या, तर प्रमुख पाहुण्या म्हणून गावाच्या प्रथम नागरिक जयश्री कैलास माळी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने माता-पालकांनी हजेरी लावली. महिलांनी मराठी, इंग्रजी आणि अहिराणी भाषेत उखाणे घेत कार्यक्रमाची रंगत वाढवली.
शाळेच्या महिला शिक्षक भगिनींनी उपस्थित महिलांना हळदी-कुंकू लावून वाण वाटले. ज्येष्ठ शिक्षिका रत्नप्रभा साळुंखे यांनी माता-पालकांना मार्गदर्शन केले. अर्चना बागुल यांनी पालकांनी आपल्या मुलांना नियमित शाळेत पाठवण्याचे महत्त्व पटवून दिले, कारण विद्यार्थ्यांची उपस्थिती ही गुणवत्तावाढीस मदत करते.
कार्यक्रमादरम्यान काही महिलांनी गैरहजर विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. सुत्रसंचालन सुनिता पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन रेखा पाटील यांनी मानले. मुख्याध्यापक छगन पाटील यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुकेश पाटील, माधवराव ठाकरे, अनिता बोरसे आणि सजावट करणाऱ्या शारदा मुकेश पाटील यांनी विशेष सहकार्य केले.