हज-उमरा यात्रेसाठी आवश्यक लसीचा तुटवडा – प्रशासनाचा गोंधळ उघड. -जिल्हाधिकाऱ्यांना लस उपलब्ध असल्याची माहिती – प्रत्यक्षात मात्र कुठेही लस नाही..

0

24 प्राईम न्यूज 4 Feb 2025

सौदी अरेबियाच्या आरोग्य मंत्रालयाने उमरा यात्रेसाठी येणाऱ्या प्रवाशांसाठी मेंनिंजायटीस तापाविरुद्ध क्वाड्रिव्हॅलेंट मेनिन्गोकोकल मेनिन्जायटीस (A+C+Y+W135) ही लस बंधनकारक केली आहे. परंतु जळगाव जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थांमध्ये ही लस उपलब्ध नसल्याने यात्रेकरूंच्या अडचणी वाढल्या आहेत.

एकता संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

लसीच्या तुटवड्यामुळे एकता संघटनेने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेतली. त्यांनी त्वरित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांशी संपर्क साधला. अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर यांनी लस उपलब्ध असल्याचे सांगितले. परंतु, प्रत्यक्ष तपासणी केल्यावर प्रभारी अधिष्ठाता डॉ. मारुतीराव पोटे व अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांनी लस उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केले.

अधिष्ठात्यांची गोंधळलेली भूमिका

फारुक शेख यांनी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क केला. त्यांनी पुन्हा “लस उपलब्ध आहे, यात्रेकरूंना पाठवा” असे सांगितले. मात्र, काही वेळातच “लस नाही” असे सांगत त्यांनी पत्र देण्याचा सल्ला दिला.

शेवटी, शासकीय महाविद्यालयाने लेखी पत्राद्वारे “सदर लस आमच्याकडे उपलब्ध नाही, ही जबाबदारी जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालयावर आहे” असे स्पष्ट केले.

जिल्हा सामान्य रुग्णालय व मनपा रुग्णालयाचाही नकार

एकता संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यांनीही लस उपलब्ध नसल्याचे सांगितले. यानंतर महानगरपालिका रुग्णालयातही विचारणा केली असता प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. घोलप यांनीही नकार दिला.

उमरा यात्रेकरूंनी लसीकरण करूनच प्रवास करावा

सौदी सरकारने प्रवासाच्या दहा दिवस आधी लसीकरण अनिवार्य केले आहे. त्यामुळे यात्रेकरूंनी आपल्या एजंटमार्फत लस घेऊनच प्रवास करावा, अन्यथा प्रवासात अडचणी येऊ शकतात.

शासनाने तातडीने उपाययोजना करावी

एकता संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे पुन्हा निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे. ही लस शासकीय महाविद्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय किंवा महानगरपालिका रुग्णालयामार्फत त्वरित उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

संघटनेच्या बैठकीत उपस्थित:

मुफ्ती खालीद, फारुक शेख, मतीन पटेल, नदीम मलिक, मजहर पठाण, कासिम उमर, आरिफ देशमुख, मुजाहिद खान, नझमोद्दिन शेख, मोहसीन शेख, जावेद रशीद, एरंडोलचे हमीद रहीम आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!