अमळनेरमध्ये ‘ग्रंथोत्सव 2024’चे भव्य आयोजन; साहित्यप्रेमींसाठी पर्वणी

आबिद शेख/अमळनेर. -वाचनसंस्कृतीला चालना देण्यासाठी जळगाव जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि पुज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ग्रंथोत्सव 2024’ चे आयोजन करण्यात आले आहे. हा भव्य सोहळा 8 व 9 फेब्रुवारी 2025 रोजी अमळनेरच्या टाऊन हॉलच्या पटांगणावर संपन्न होणार आहे.
ग्रंथदिंडी ठरणार विशेष आकर्षण
8 फेब्रुवारीला सकाळी 9 वाजता ग्रंथदिंडी काढण्यात येणार असून, या दिंडीचे पूजन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते होईल. या दिंडीत स्थानिक वाचक, विद्यार्थी आणि मान्यवर सहभागी होतील. ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने अनेक प्रकाशनांचे स्टॉल्स ग्रंथप्रेमींसाठी प्रदर्शन व विक्रीसाठी उपलब्ध असतील.
मुख्य सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती
सकाळी 11 वाजता ग्रंथोत्सवाचे उद्घाटन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे असतील. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार संजय सावकारे, खासदार स्मिताताई वाघ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहतील.
सांस्कृतिक आणि बौद्धिक कार्यक्रमांची रेलचेल
दुपारी 3 वाजता डॉ. एस. के. पाटील (मालेगाव दाभाडी) यांचे ‘अहिराणी वैभव’ या विषयावर प्रबोधनात्मक प्रवचन होणार आहे. सायंकाळी 5 वाजता मयूर देशमुख (नाशिक) आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा ‘महाराष्ट्रातील थोर संतांच्या जीवनावरील संगीतमय भारुड’ हा कार्यक्रम रंगणार आहे.
9 फेब्रुवारीला हास्य, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सत्कार सोहळा
दुसऱ्या दिवशी सकाळी प्रा. महेंद्र गणपुले (नारायणगाव, पुणे) यांचा ‘हास्यनगरी’ हा बहारदार कार्यक्रम रसिकांचे मनोरंजन करणार आहे. दुपारच्या सत्रात ‘कृत्रिम बुद्धिमत्तेच्या दिशेने ग्रंथालयाची वाटचाल’ या विषयावर व्याख्यान होणार असून, त्यानंतर आदिवासी विकास आयुक्तालयाचे सहआयुक्त कपिल पवार यांचे व्याख्यान होईल. तसेच, दीर्घकाळ सेवा देणाऱ्या ग्रंथपालांचा सत्कार केला जाणार आहे.
हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे आणि आयोजकांनी सर्व साहित्यप्रेमींना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.