मतदार मदत केंद्रातील डेटा एंट्री ऑपरेटरसाठी वेतनवाढ व मुदतवाढीची मागणी…

24 प्राईम न्यूज 7 Feb 2025. -जळगांव जिल्ह्यातील सर्व तालुका स्तरावरील मतदार मदत केंद्रातील (Voter Help Center) डेटा एंट्री ऑपरेटर यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे वेतनवाढ व मुदतवाढीची मागणी करणारे निवेदन सादर केले आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 2012 पासून कार्यरत असलेल्या या केंद्रांमध्ये संगणक चालकांची नियुक्ती कंत्राटी पद्धतीने केली जाते. मात्र, विविध जिल्ह्यांमध्ये नियुक्ती प्रक्रियेत तफावत असून, वेगवेगळ्या कंत्राटदारांमार्फत कमी मानधनात काम करावे लागत असल्याने डेटा एंट्री ऑपरेटर असुरक्षिततेच्या संकटात आहेत, अशी त्यांनी तक्रार केली आहे.
प्रमुख मागण्या:
- समान काम समान वेतन धोरणानुसार 27,000 ते 35,000 रुपये मानधन द्यावे.
- नियुक्ती शासनाकडून किंवा जिल्हा सेतू समितीद्वारे द्यावी व 58 वर्षे वयापर्यंत शास्वती मिळावी.
सध्या निवडणूक प्रक्रियेसाठी 31 डिसेंबर 2024 पर्यंतच मुदतवाढ मिळालेली आहे. त्यानंतरही सेवा कायम ठेवण्यात यावी, अन्यथा अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडतील, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांतील डेटा एंट्री ऑपरेटर यांनी हे निवेदन सादर केले असून, प्रशासनाने यावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.