लग्नाचे आमिष देऊन ३७ वर्षीय महिलेवर अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल..

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर: तालुक्यातील झाडी येथील ३७ वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करत वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी चारूदत्त विलास पाटील (वय ३७, रा. झाडी, ह.मु. कुऱ्हा काकोडा, ता. मुक्ताईनगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित महिलेची आरोपी चारूदत्त याच्याशी २००८ मध्ये ओळख झाली होती. पीडित महिलेचा पती दारूच्या आहारी गेलेला असल्याने चारूदत्तने तिला लग्नाचे आमिष दाखवले आणि वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
महिलेने नाशिक येथे पतीसोबत राहायला गेल्यानंतरही आरोपीने तिच्यावर अत्याचार सुरूच ठेवला. काही काळानंतर त्याला मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा येथे नोकरी मिळाल्याने तो तेथे निघून गेला. मात्र, त्याने महिलेचे फोन उचलणे बंद केले.
यामुळे पीडित महिलेने प्रत्यक्ष जाऊन जाब विचारला असता, त्याचे इतर महिलांसोबतही अवैध संबंध असल्याचे आढळले. तसेच, त्याने लग्नास नकार देत तिच्याशी गैरवर्तन केले व शिवीगाळ करत मारहाण केली.
याप्रकरणी त्रासाला कंटाळलेल्या महिलेने गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, जी ६ फेब्रुवारी रोजी मारवड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील करीत आहेत.