‘माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठा बदल: ५ लाख अपात्र महिलांना वगळण्याचा सरकारचा निर्णय..

विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी महत्त्वाची ठरलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना आता मोठ्या बदलातून जात आहे. राज्य सरकारने योजनेतून ५ लाख अपात्र लाभार्थींना वगळण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे महिन्याला ७५ कोटी रुपयांची बचत होणार आहे.
महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी शुक्रवारी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर याबाबत घोषणा केली. २८ जून आणि ३ जुलै २०२४ च्या शासन निर्णयानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०२५चा आठवा हप्ता वितरीत करण्यापूर्वीच या महिलांना योजनेतून वगळले जाणार आहे.
जुलै २०२४ मध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यात दरमहा १५०० रुपये थेट जमा होतात. विधानसभेच्या निवडणुकीत या योजनेने महायुतीला मोठा फायदा करून दिला होता. मात्र, ४८ हजार कोटी रुपयांचा वार्षिक खर्च परवडणारा नसल्याने सरकारला आढावा घ्यावा लागला. त्यात मोठ्या प्रमाणात अपात्र लाभार्थी असल्याचे आढळून आले.
तरीही पात्र महिलांना नियमित लाभ मिळत राहील, असे आश्वासन राज्य सरकारने दिले आहे.