मनियार बिरादरीचा अभिनव उपक्रम: साखरपुड्यातच विवाहाची नवी परंपरा..

24 प्राईम न्यूज 8 Feb 2025. -जळगाव जिल्हा मुस्लिम मनियार बिरादरीने सुरू केलेल्या अभिनव उपक्रमामुळे साखरपुडा ठरल्यानंतर लगेच विवाह लावण्याची नवी परंपरा रुजू लागली आहे. मागील वर्षी या पद्धतीने ३७ विवाह पार पडले असून, यंदाच्या वर्षातील पहिला विवाह शिरसोली येथे नुकताच संपन्न झाला.
साखरपुड्याचे विवाहात रूपांतर
यावल येथील शेख शाहिद आणि शिरसोली येथील मिसबाह यांचा साखरपुडा ठरला होता. मात्र, वर आणि वधूचे आजोबा नबी मिस्त्री हे एकच असल्याने त्यांनी ही प्रथा पुढे नेत साखरपुड्याच्या ठिकाणीच विवाह लावण्याचा निर्णय घेतला. अल-फतेह मनियार बिरादरी फाउंडेशन आणि जळगाव जिल्हा मुस्लिम मनियार बिरादरीच्या पुढाकारामुळे हा साखरपुडा थेट विवाहात रूपांतरित झाला.
या विवाह सोहळ्यासाठी जळगाव जिल्हा मुस्लिम मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, शहराध्यक्ष सैयद चांद, खजिनदार ताहेर शेख, सहसचिव अब्दुल रऊफ टेलर यांनी उपस्थित राहून वधू-वर व त्यांच्या कुटुंबीयांचे अभिनंदन केले.
बिरादरीचे आवाहन
जळगाव जिल्हा मुस्लिम मनियार बिरादरीने सर्व समाजबांधवांना साध्या पद्धतीने विवाह लावण्याचे आवाहन केले आहे. अध्यक्ष फारुक शेख यांनी सांगितले की, नववर्षात शक्यतो साखरपुडा न करता त्याच वेळी विवाह लावण्याची परंपरा अवलंबावी. यामुळे अनावश्यक खर्च टळेल आणि विवाह सोहळा अधिक साधा-सोपा होईल.
विवाह यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न
या विवाहासाठी वधूपक्षातर्फे शेख अमीन, शामिना बी, लुकमान शेख, करीम शेख, शकील शेख, नासिर शेख, इब्राहिम हाजी, बिस्मिल्ला शेख, अकील मेंबर, खलील मनियार, गुलाब मनियार यांनी तर वरातर्फे नसीम बी, रशीद मेंबर, शकील शेख, हाजी लतीफ, अनिस शेख, अन्सार शेख, रियाज अहमद, रुकसाना बी, हमीद शेख आदींनी विशेष योगदान दिले.