अमळनेर : वेळेचे नियोजन करा आणि परीक्षेत यशस्वी व्हा – आमदार अनिल पाटील..


आबिद शेख/अमळनेर. “परीक्षेत यशस्वी व्हायचे असेल तर वेळेचे नियोजन करा आणि ठरवलेल्या वेळापत्रकाची काटेकोर अंमलबजावणी करा,” असा सल्ला आमदार अनिल पाटील यांनी दिला. जी. एस. हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसोबत “परीक्षा पे चर्चा” करताना त्यांनी हे मार्गदर्शन केले.
एका कार्यक्रमानिमित्त शाळेला भेट दिल्यानंतर आमदार पाटील यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी अंतर्गत व लेखी गुणांची माहिती घेतली आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या सवयी जाणून घेतल्या. “कॉपी करू नका, कारण ती स्वतःलाच फसवण्यासारखी आहे. वेळेचे योग्य नियोजन करा, दिवसाचे २४ तास ठरवून त्यात अभ्यासासोबतच आराम, खेळ, गप्पा आणि जेवणासाठीही वेळ द्या. योग्य नियोजन केल्यास अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळतो आणि यश मिळवता येते,” असे ते म्हणाले.
यावेळी गटविकास अधिकारी एन. आर. पाटील, गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील, कक्ष अधिकारी कैलास पाटील, केंद्र प्रमुख शरद सोनवणे, आर. जे. पाटील आणि संजय पाटील उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आमदारांसोबत फोटोही काढले.