राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात कठोर कारवाई करा, अन्यथा आंदोलन – प्रजाशक्ती क्रांती दलाचा इशारा…

आबिद शेख/अमळनेर छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा राज्यभर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा प्रजाशक्ती क्रांती दलाचे राष्ट्रीय सचिव ऍड. सतीश आर. मोरे यांनी दिला आहे.
राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य करून महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घातला आहे. त्यांच्या विधानामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या असून, त्यांनी महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप प्रजाशक्ती क्रांती दलाने केला आहे.
महायुतीसोबत राहायचे की नाही, याचा विचार करावा लागेल – प्रा. अशोराज तायडे
या मुद्द्यावर प्रजाशक्ती क्रांती दलाचे नेते प्रा. अशोराज तायडे यांनीही तीव्र प्रतिक्रिया देत म्हटले की,
- “छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राहुल सोलापूरकर यांच्यावर कठोर कारवाई झाली नाही, तर आम्ही संपूर्ण राज्यभर आंदोलन करू.”
- “महायुती सरकारने अशा बालिश विधान करणाऱ्या राहुल सोलापूरकरला बालसुधारगृहात पाठवावे.”
- “जर कठोर कारवाई झाली नाही, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीसोबत राहायचे की नाही, याचा आम्हाला पुनर्विचार करावा लागेल.”
पोलीस संरक्षण हटवून अटक करण्याची मागणी
प्रजाशक्ती क्रांती दलाने मुख्यमंत्री यांना विनंती केली आहे की, राहुल सोलापूरकर यांना पुरवलेले पोलीस संरक्षण त्वरित काढावे आणि त्यांना अटक करावी. तसेच, या वक्तव्यामागे कोणी ‘बोलवता धनी’ आहे का, याचाही शोध घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या मागण्यांसह प्रजाशक्ती क्रांती दलाच्या वतीने जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावर त्वरित कारवाई न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा संघटनेने दिला आहे.