“बँकेतून पैसे काढले आणि चोरट्यांनी गाठले – ९ लाखांची नाट्यमय लूट!”

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर: बँकेतून पैसे काढल्यानंतर पाठलाग करत दोन दुचाकीस्वारांनी ९ लाख रुपयांची पिशवी हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना १० फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजता घडली.
नगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी बापू शिंगाणे (रा. भोईवाडा) हे पत्नी सुरेखा यांच्यासोबत IDBI बँकेतून ९ लाख रुपये काढून घरी जात होते. त्यांनी पैसे नीट पिशवीत गुंडाळून ती दुचाकीला टांगली व मांडीत ठेवली. मात्र, घराजवळ पोहोचताच काळ्या मोटरसायकलवर आलेल्या दोन इसमांनी वेगाने येऊन पिशवी हिसकावली आणि पसार झाले.
लोकांनी पाठलाग केला पण अपयश घटनेनंतर नागरिकांनी चोरांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते पसार होण्यात यशस्वी ठरले. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, डीवायएसपी भाऊसाहेब घोलप, पोलीस निरीक्षक विकास देवरे आणि इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, हे दोघे आंध्र प्रदेशातील गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, ४ फेब्रुवारी रोजी खामगाव येथेही त्यांनी अशाच प्रकारे एका व्यक्तीला लुटल्याचे उघड झाले आहे.
पोलीस तपास सुरू
बापू शिंगाणे यांच्या तक्रारीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक विकास देवरे तपास करत आहे.