वा.रा. सोनार यांच्या चेतश्री प्रकाशनाचा नवोदित लेखकांना फायदा..

आबिद शेख/अमळनेर. अमळनेरच्या वैचारिक परंपरेचा वारसा जपणारे ज्येष्ठ साहित्यिक वा.रा. सोनार यांच्या चेतश्री प्रकाशनमुळे अनेक नवोदित लेखकांना लिखाणाची संधी मिळाली. त्यांनी साहित्य क्षेत्रात मोलाची भूमिका बजावत, अनेक दिग्गज लेखक आणि विचारवंतांचे विचार अमळनेरच्या जनतेपर्यंत पोहोचवले.
साने गुरुजींच्या “खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे” या विचारांना आपल्या कृतीत उतरवणारे सोनार कुटुंब ग्रामीण भागातील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहे. “वाचू या आनंदे, जगू या आनंदे” या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांना वाचनाची गोडी लागावी आणि त्यांचे ज्ञान वाढावे, यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.
साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्या कार्यवाह दर्शना पवार यांनी “आपण हा लिखाणाचा वारसा जपूया, वाचा, शब्द जोडा, व्यक्त व्हा – आम्ही तुमच्या सोबत आहोत” असे सांगत तात्यांच्या आठवणींना उजाळा दिला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या हाती सुंदर पुस्तके आल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. जैतपीर माध्यमिक विद्यालय तसेच जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षक व मुख्याध्यापकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.