दिल्ली येथे “विदेश में हिंदी” पुस्तकाचे भव्य प्रकाशन

0

आबिद शेख/अमळनेर

दिल्लीतील जागतिक पुस्तक मेळाव्यात (वर्ल्ड बुक फेअर) प्रताप महाविद्यालयाच्या माजी हिंदी विभागप्रमुख प्रो. कुबेर कुमावत यांनी संपादित केलेल्या ‘विदेश में हिंदी’ या महत्त्वपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन दि. ७ फेब्रुवारी २०२५ रोजी करण्यात आले. सर्व भाषा ट्रस्ट, नवी दिल्ली यांच्यावतीने प्रकाशित या पुस्तकात हिंदी भाषा, साहित्य, शिक्षण, व्यापार आणि जनसंचार या क्षेत्रांत हिंदीच्या जागतिक पातळीवरील भूमिका यावर संशोधनपर लेख आणि अनुभव समाविष्ट आहेत.

हे पुस्तक प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय उच्चतर शिक्षण अभियान (रूसा) च्या सहकार्याने २४ व २५ फेब्रुवारी २०२४ रोजी भरलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर झालेल्या लेखांवर आधारित आहे. या परिषदेत देश-विदेशातील अनेक हिंदी अभ्यासक, लेखक आणि शिक्षकांनी सहभाग घेतला होता.

प्रकाशन सोहळ्यास दिग्गज उपस्थित

या भव्य प्रकाशन सोहळ्यात हिंदी साहित्य क्षेत्रातील अनेक नामवंत लेखक आणि अभ्यासक उपस्थित होते. प्रमुख मान्यवरांमध्ये प्रसिद्ध साहित्यकार ओम निश्चल, वरिष्ठ कवी प्रभात पांडेय, व्यंग्यकार सुभाष चंदर, जेएनयू विद्यापीठाचे माजी प्राध्यापक डॉ. हेमचंद्र पांडे, साहित्यकार कर्मेंदु शिशिर, प्रो. दिविक रमेश, केंद्रीय अनुवाद ब्युरोचे माजी संचालक डॉ. श्रीनारायण समीर यांचा समावेश होता.

तसेच केंद्रीय हिंदी निदेशालयाचे सहायक निदेशक डॉ. दीपक पांडेय आणि डॉ. नूतन पांडेय, साहित्यकार डॉ. सुभाष वशिष्ठ, ज्ञानचंद बागड़ी, राजभाषा विभागाच्या डॉ. भावना सक्सेना आणि श्रीमती सुनीता पाहुजा, डॉ. दीप्ती अग्रवाल, तसेच भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (ICCR) चे वरिष्ठ कार्यक्रम निदेशक सुनील कुमार सिंह हेही उपस्थित होते.

विशेष म्हणजे, प्रसिद्ध अभिनेते अखिलेंद्र मिश्र, दिल्ली विद्यापीठाच्या प्राध्यापिका डॉ. ज्योती शर्मा, सर्व भाषा ट्रस्टचे प्रकाशक केशव मोहन पांडेय आणि श्रीलंकेची विद्यार्थीनी हंसिका समलका यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली.

प्रो. कुबेर कुमावत यांचे अभिनंदन

या महत्त्वपूर्ण प्रकाशनाबद्दल खान्देश शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य आणि प्राध्यापक वर्गाने संपादक प्रो. कुबेर कुमावत यांचे अभिनंदन केले आहे. ‘विदेश में हिंदी’ हे पुस्तक हिंदी भाषा आणि तिच्या जागतिक प्रवासाला नव्याने समजून घेण्यासाठी महत्त्वाचे योगदान देईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!