गरीब कष्टकऱ्यांना दिलासा; ८० फुटी रस्त्याच्या मार्गात बदल करून विकासाला गती…

आबिद शेख/अमळनेर
शहरातील ८० फुटी रस्त्याच्या कामात गरिबांचे घर वाचवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला गेला आहे. माजी नगरसेवक प्रताप शिंपी यांच्या विनंतीवरून आमदार अनिल पाटील यांनी हस्तक्षेप करून रस्त्याचा मार्ग बदलला, ज्यामुळे अनेक गरीब कुटुंबांचे संसार उघड्यावर येण्यापासून वाचले.
मुंदडा नगर ते मरी माता मंदिरापर्यंत होणाऱ्या या रस्त्यामुळे ओम शांती नगरमधील हातमजुरी करणाऱ्या कष्टकऱ्यांची घरे बाधित होणार होती. परिस्थितीची जाणीव होताच माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी त्वरित निर्णय घेतला आणि रस्त्याचा मार्ग दुसऱ्या बाजूने वळवून विकास साधला. यामुळे रस्ता होण्याचा मार्ग मोकळा झाला आणि गरिबांचे मोठे नुकसान टळले.
या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांत समाधानाचे वातावरण असून, गरिबांच्या हिताचा विचार करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे कौतुक केले जात आहे.