खोदला खड्डा आणि निघाला कुत्रा!

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर शहरातील गांधलीपुरा भागात इदगाह मैदानाच्या शेजारी संशयास्पद हालचाली दिसल्याने पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. एका नागरिकाने पांढऱ्या कपड्यात काहीतरी गुंडाळून खड्ड्यात पुरताना पाहिल्याची माहिती पोलीस निरीक्षक विकास देवरे यांना दिली. लहान मूल किंवा प्राणी पुरल्याचा संशय व्यक्त होताच, पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी कुदळ-पावडी आणून खड्डा उकरण्यास सुरुवात केली आणि सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली. मात्र, प्रत्यक्षात खड्ड्यातून काही वेगळेच समोर आले—पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेला एक पाळीव कुत्रा! विशेष म्हणजे, त्या कुत्र्याला विधिवत पूजा करून फुले वाहत सन्मानपूर्वक पुरण्यात आले होते.
संशयास्पद वाटलेला प्रकार शेवटी एका पाळीव प्राण्याच्या शेवटच्या विधीपुरता मर्यादित राहिला. पोलिसांनी नोंद घेतली आणि कुत्र्याला पुन्हा आदराने पुरले.