छत्रपती शिवाजी महाराज जयंतीपूर्व संध्येला अमलनेरमध्ये सफाई कामगारांचा सन्मान…

आबिद शेख/अमळनेर
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पूर्वसंध्येला अमलनेर नगरपालिकेचे सफाई कामगार भगवा चौक स्वच्छ व सुंदर करण्यासाठी मेहनत घेत होते. त्यांच्या कार्याची दखल घेत साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानचे गोपाळ नेवे यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना “नवयुग निर्माते छत्रपती शिवराय” हे पुस्तक भेट दिले.
या वेळी प्रविण संदानशिव, गौतम बिह्राडे, दिलीप बिह्राडे, प्रविण वाघ, राम रामराजे, विनोद बिह्राडे, दर्शन बिह्राडे हे सफाई कर्मचारी उत्साहाने कार्यरत होते. गोपाळ नेवे यांनी त्यांच्याशी संवाद साधत त्यांचे कौतुक केले आणि सांगितले की, “कार्यक्रमाच्या आधी व नंतर होणारी स्वच्छता ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. आपण सामाजिक कार्य करताना त्या जागेचे सौंदर्य वाढवतो, मात्र त्याची देखभालही तितकीच महत्त्वाची आहे.”
या सत्कार सोहळ्याला भगवा चौकातील नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचे कौतुक केले. “शहर स्वच्छ ठेवणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांप्रती आम्ही कृतज्ञ आहोत,” अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.