रोटरी क्लब अमळनेरचा समाज उपयोगी उपक्रम सप्ताह उत्साहात साजरा….

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर रोटरी क्लब अमळनेरतर्फे दि. 16 ते 23 फेब्रुवारी 2025 दरम्यान विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांत महिला आरोग्य व सक्षमीकरण, रस्ते सुरक्षा, विविध रोग तपासण्या, नेत्र विकार, व्यसनमुक्ती आणि रक्तदान अशा विविध विषयांचा समावेश आहे.
महिलांसाठी गर्भाशय मुखाचा कर्करोग जनजागृती कार्यक्रम
दि. 16 फेब्रुवारी 2025 रोजी Cervical Cancer (गर्भाशय मुखाचा कर्करोग) यावरील मार्गदर्शनासाठी चाळीसगाव येथील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ रो. डॉ. उज्वला देवरे मॅडम यांना आमंत्रित करण्यात आले होते. या सत्राद्वारे महिलांना आरोग्य विषयक जागरूकता देण्यात आली. रोटरी क्लब पुढील काळात अशाच स्वरूपाचे आणखी दोन मार्गदर्शन सत्र आयोजित करणार आहे.
तंबाखू व मद्यपानविरोधी जनजागृती चित्रपट प्रदर्शन
दि. 18 फेब्रुवारी 2025 रोजी रोटरी क्लब अमळनेरतर्फे तंबाखू व मद्यपान विरोधी जनजागृतीसाठी चित्रपट प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. ग्लोबल व्हिव्ह स्कूल आणि स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमधील ६ वी ते ९ वीच्या 600 विद्यार्थ्यांसाठी हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
चित्रपटाद्वारे विद्यार्थ्यांना तंबाखू व मद्यपानाचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. तसेच चित्रपटानंतर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले, जिथे रोटरीचे उप प्रांतपाल रो. अभिजीत भांडारकर आणि रो. प्रतीक जैन यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांचे प्रश्न सोडवले. उपस्थित विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त जीवन जगण्याची शपथ घेतली आणि हा संदेश आपल्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केला.
या कार्यक्रमात रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. ताहा बुकवाला, शाळेचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उपस्थित पालक आणि शिक्षकांनी या जनजागृती उपक्रमाचे भरभरून कौतुक केले आणि असे उपक्रम भविष्यातही राबवण्याची मागणी केली.
HIV अनाथ मुलांसाठी सकस आहार आणि प्रोटीन टिन वाटप
दि. 18 फेब्रुवारी 2025 रोजी दर महिन्याला होणाऱ्या उपक्रमांतर्गत आधार बहुद्देशीय संस्था आणि रोटरी क्लब अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने HIV सह जगणाऱ्या 30 अनाथ मुलांना सकस आहार आणि प्रोटीन टिन वाटप करण्यात आले.
या उपक्रमासाठी अमळनेर येथील प्रसिद्ध डॉ. पुरोहित यांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त योगदान दिले, तसेच आली अजगर भाई जळगाववाला आणि हुसेन भाई जळगाववाला यांच्या वतीने धान्य आणि प्रोटीन टिनचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात आधार बहुद्देशीय संस्थेच्या सौ. भारती पाटील आणि त्यांच्या टीमचे विशेष सहकार्य लाभले. तसेच रोटरीचे अध्यक्ष रो. ताहा बुकवाला, उप प्रांतपाल रो. अभिजीत भांडारकर, रो. डॉ. अनिल वाणी, रो. चेलाराम सैनानी, रो. महेश पाटील, रो. मकसूद बोहरी, रो. रोहित सिंघवी, रो. कीर्तीकुमार कोठारी, रो. धीरज अग्रवाल आणि इतर रोटेरियन उपस्थित होते.
रोटरी क्लब अमळनेर समाजहिताचे असेच उपक्रम आगामी दिवसांतही राबवणार असल्याची माहिती रोटरीचे पी.आर.ओ. रो. अभिजीत भांडारकर यांनी दिली.