एकतर्फी प्रेमाचा अजब पराक्रम; चिठ्ठी देणाऱ्या तरुणाला मिळाली चपलांची शिक्षा..

आबिद शेख/ अमळनेर
शहरातील शिवाजी बगीच्याजवळ मंगळवारी (१८ रोजी) दुपारी १२ वाजता एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाचा धाडस महागात पडले. आपल्या आई-वडिलांसोबत जाणाऱ्या तरुणीला त्याने प्रेमाची चिठ्ठी देण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीच्या वडिलांच्या तीक्ष्ण नजरेतून हा प्रकार सुटला नाही.
तरुणाने चिठ्ठी देताच मुलीच्या वडिलांनी हा प्रकार हेरला आणि लगेचच संतापून त्याच्या मागे धाव घेतली. आई आणि मुलीसह स्थानिक नागरिकही त्याला पकडण्यासाठी सरसावले. अखेर काही लोकांच्या मदतीने माजी नगरसेवक प्रताप शिंपी आणि जीवन पवार यांनी तरुणाला रोखले आणि पोस्ट ऑफिस कार्यालयात नेले.
याठिकाणी संतप्त माय-लेकींनी त्याच्यावर जोरदार चपलांचा प्रसाद वाटला. चौकशीत हा तरुण वावडे येथे मामाकडे राहत असल्याचे समजले. अखेरीस वरिष्ठ नागरिकांच्या मध्यस्थीने त्याला मुलीची माफी मागायला लावण्यात आले आणि प्रकरण शांत करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात चांगलीच चर्चा रंगली.