बहुआयामी पत्रकारितेची गरज – युवराज पाटील.

आबिद शेख/अमळनेर
“आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ मुद्रित माध्यमांवर विसंबून न राहता संपादकांनी बहुआयामी माध्यमे हाताळण्याचे कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी केले.
आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा पत्रकार संघातर्फे पत्रकार भवनात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना युवराज पाटील यांनी भारतीय पत्रकारितेच्या विकासाचा आढावा घेतला. मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष विजयबापू पाटील अध्यक्षस्थानी होते.
पत्रकारितेचा पाया बाळशास्त्रींनी रोवला
ब्रिटिशकालीन पत्रकारिता, स्वातंत्र्योत्तर पत्रकारिता आणि आजच्या डिजिटल युगातील पत्रकारिता यातील अंतर स्पष्ट करताना युवराज पाटील म्हणाले, “बाळशास्त्री जांभेकरांनी केवळ पत्रकार घडवले नाहीत, तर समाजाला दिशा देणारे शिक्षकही तयार केले. त्यांनी संघर्षमय जीवनात अनेक भाषा अवगत करून ‘दर्पण’ आणि ‘दिग्दर्शन’सारखी प्रभावी नियतकालिके चालवली.”
स्वातंत्र्यानंतर माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले. मुद्रण माध्यमांबरोबरच रेडिओ, दूरदर्शन, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि आता डिजिटल माध्यमांचा प्रभाव वाढला आहे. “ट्विटरसारख्या प्लॅटफॉर्मवर कमी शब्दांत प्रभावी मजकूर मांडण्याचे कौशल्य पत्रकारांनी आत्मसात करायला हवे,” असेही त्यांनी नमूद केले.
पत्रकारांनी लेखणीला धार द्यावी – संदीप घोरपडे
प्रमुख वक्ते संदीप घोरपडे यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या योगदानाचा गौरव करताना, आजच्या दिशाहीन होत चाललेल्या पत्रकारितेवर चिंता व्यक्त केली. “बाळशास्त्रींना सर्व भाषा समजत होत्या, पण पैशांची भाषा नाही! ज्यांना पैशांची भाषा समजते, त्यांची लेखणी भलत्याच दिशेने वळते,” अशी टीका त्यांनी केली. “सामाजिक बदल घडवायचा असेल, तर पत्रकारांच्या लेखणीला धार हवी,” असे ते म्हणाले.
विजयबापू पाटील यांचा सत्कार
या कार्यक्रमात जिल्हा पत्रकार संघाचे विश्वस्त मंडळ अध्यक्ष विजयबापू पाटील यांचा ७१व्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात त्यांनी आपल्या पत्रकारितेतील आठवणींना उजाळा दिला.
नव्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार
जिल्हा पत्रकार संघाच्या संघटकपदी सुरेश पाटील (यावल) यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच अमळनेर तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बापूराव पाटील यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन दिलीप शिरुडे यांनी केले, तर प्रमोद पाटील यांनी आढावा घेतला आणि भिकाभाऊ चौधरी यांनी आभार मानले.