लोणखुर्द ग्रामपंचायतीला मिळाले ब्रीदवाक्य आणि बोधचिन्ह – ग्रामसभेत ऐतिहासिक निर्णय

आबिद शेख/अमळनेर
लोणखुर्द (ता. अमळनेर) – ग्रामसभेतून ग्रामपंचायतीला ब्रीदवाक्य आणि बोधचिन्ह मिळणे ही स्थानिक राजकारणासाठी अभिमानाची बाब असून, ही परंपरा गावाच्या सर्वांगीण विकासाला गती देणारी ठरेल, असे मत माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी व्यक्त केले. शिवजयंतीच्या औचित्यावर लोणखुर्द ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत या ऐतिहासिक निर्णयांची घोषणा करण्यात आली.
बुधवारी (दि. १९ फेब्रुवारी) पार पडलेल्या विशेष ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच डॉ. शशिकांत पाटील होते. तर उद्घाटन माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्याला अमळनेर बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, संचालक भोजमल पाटील, समाधान धनगर, विजय पाटील, जाकीर शेख, माजी सरपंच डॉ. जे. टी. शिंदे, तसेच कृषी सहायक निशा सोनवणे उपस्थित होते.
ग्रामसभेच्या प्रारंभी महाराष्ट्र राज्यगीत आणि शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विशेष ग्रामसभा आणि शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. चिमुरडी ऋणी पाटील हिने नृत्यातून मान्यवरांचे स्वागत केले. तसेच, २५ वर्षे अविरत सेवा दिलेल्या माजी ग्रामपंचायत शिपाई गंगाराम पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
“सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय” ब्रीदवाक्याची निवड
ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून कार्यरत राहिलेल्या सर्व माजी सरपंचांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. त्यातून माजी सरपंच संगीता अशोक पाटील यांची निवड झाली. त्यांच्या हस्ते “सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय” या ब्रीदवाक्याचे अनावरण करण्यात आले.
ग्रामविकासाचे दिशादर्शक बोधचिन्ह अनावरण
गावाच्या शिक्षण, आरोग्य, सौरऊर्जा, जलसंधारण, ग्रामरस्ते आणि वृक्षसंवर्धनास प्राधान्य देणाऱ्या बोधचिन्हाचे अनावरण अमळनेर बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामसभेतून ब्रीदवाक्य आणि बोधचिन्ह ठरवणे ही लोणखुर्द ग्रामपंचायतीच्या इतिहासातील सुवर्णक्षण असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामविकासासाठी महत्त्वाचे ठराव
ग्रामसेवक विजय पाटील यांनी विविध ठराव मांडले, ज्यात ग्राम कृषी विकास समिती आणि ग्राम बाल संरक्षण समितीच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. तसेच, दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी कृषी विकास समितीची सभा घेण्याचा ठराव पारित करण्यात आला.
पर्यटन विकासाच्या अनुषंगाने गावात महादेव मंदिर उभारण्याबाबत चर्चा झाली. या विशेष ग्रामसभेचा उद्देश नाविन्यपूर्ण ठराव मंजूर करून गावविकासाला वेग देणे आणि ग्रामस्थांचा राजकीय सहभाग वाढवणे हा होता.
सरपंच डॉ. शशिकांत पाटील यांनी “सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय” या ब्रीदवाक्याचा अर्थ स्पष्ट करताना सांगितले की, जात, धर्म, भाषा किंवा आर्थिक परिस्थितीवर कोणताही भेदभाव न करता गावातील सर्व नागरिकांच्या हितासाठी ग्रामपंचायत कार्यरत राहील.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापुराव पाटील यांनी केले, तर आभार मधुकर पाटील यांनी मानले. विशेष ग्रामसभेस ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संगणक परिचालक अशोक पाटील, ग्रामपंचायत शिपाई भिकन पाटील, समाधान पाटील, सचिन शिंदे, समाधान भील, आरबाज मदारी, देवचंद भील, संदीप भील, हर्षल पाटील, निलेश शिंदे आणि मुकेश पाटील यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.