अमळनेरच्या विद्रोही साहित्य संमेलनाची परमोच्च प्रतिष्ठा—संभाजीनगर संमेलनात गौरवोद्गार..

आबिद शेख/अमळनेर
संभाजीनगर येथील मलिक अंबर नगरीत सुरू असलेल्या १९ व्या विद्रोही साहित्य संमेलनात आजी-माजी अध्यक्षांसह मान्यवरांनी अमळनेरच्या १८ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे विशेष कौतुक केले. “विद्रोही साहित्य संमेलनाच्या इतिहासातील परमोच्च संमेलन” असे गौरवोद्गार या संमेलनात काढण्यात आले.
उद्घाटन सत्रात प्रमुख भाषण करताना माजी संमेलनाध्यक्ष डॉ. वासुदेव मुलाटे यांनी अमळनेर येथील संयोजकांच्या कार्यक्षमतेचा उल्लेख करत “कमी बोलणारे, पण मोठे कार्य करणारे” असे त्यांचे विशेष कौतुक केले.
या वेळी १८ व्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्याम पाटील, निमंत्रक रणजित शिंदे, समन्वयक प्रा. अशोक पवार यांचा संविधान व स्मृतिचिन्ह देऊन भव्य सत्कार करण्यात आला. हा सत्कार नूतन संमेलनाध्यक्ष लोकसंस्कृती अभ्यासक डॉ. अशोक राणा, मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. वासुदेव मुलाटे, विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी यांच्या हस्ते संपन्न झाला.
संमेलनाचे उद्घाटक दिल्ली येथील ज्येष्ठ साहित्यिक मा. कवल भारती, प्रमुख पाहुणे प्रख्यात उर्दू साहित्यिक नुरुल हसनैन, प्रतिइतिहासकार चंद्रशेखर शिखरे, स्वागताध्यक्ष इंजी. सतिश चकोर, मुख्य निमंत्रक ॲड. धनंजय बोरडे, तसेच माजी संमेलनाध्यक्ष डॉ. प्रल्हाद लुलेकर, डॉ. प्रतिभा अहिरे, किशोर ढमाले आदी मान्यवर उपस्थित होते.
“सांस्कृतिक वर्चस्वाचे राजकारण” या परिसंवादात अमळनेर येथील विद्रोही संमेलनाचे संयोजक प्रा. डॉ. लिलाधर पाटील सहभागी झाले होते. तसेच, शिव व्याख्याते रामेश्वर भदाणे, अशोक बिऱ्हाडे, किरण बागुल, डी. ए. पाटील, प्रा. सुनिल वाघमारे, प्रा. कांबळे, संजय पाटील आणि संयोजन समितीचे इतर सदस्य संमेलनात सहभागी झाले होते.
संमेलनास हजारोंच्या संख्येने साहित्यप्रेमी, रसिक प्रेक्षक व सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते, त्यामुळे संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.