मुंदडा नगर गेट भागात लाखो लिटर पाण्याचा अपव्यय – नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर शहरातील 80 फुटी रस्त्यावर खोदकामामुळे पाईपलाईन फुटल्याने दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून, रस्त्यावर पाणी साचल्याने पायी चालणेही कठीण झाले आहे.
संबंधित भागात गेल्या काही दिवसांपासून रस्ते खोदकाम सुरू आहे, मात्र पाणीपुरवठा योजनेची काळजी न घेतल्याने पाईपलाईन फुटण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. स्थानिक रहिवाशांनी या समस्येकडे नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असला, तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही रोज लाखो लिटर पाणी वाया जात असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. “एकीकडे पाण्याची टंचाई असताना इतक्या मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जाणे, ही प्रशासनाची उदासीनता दर्शवते,” असे एका रहिवाशाने सांगितले.
तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी
नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घेऊन फुटलेली पाईपलाईन दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. नगरपालिका प्रशासन या गंभीर समस्येकडे कधी लक्ष देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.