९ लाखांची चोरी उघड – आंध्रप्रदेशातील सराईत टोळीला अमळनेर पोलिसांची अटक..

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर – महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि इतर राज्यांमध्ये बॅग लिफ्टिंग आणि बँक ग्राहकांच्या रोकडवर डोळा ठेवून चोरी करणाऱ्या आंध्रप्रदेशातील टोळीला अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे. विशेषतः अमळनेर येथून ९ लाखांची रोकड लांबवणाऱ्या या गुन्हेगारांना पोलिसांनी शोधून काढले आहे.
घटना कशी उलगडली?
१० फेब्रुवारी रोजी, बापू शिंगाणे यांनी प्लॉट खरेदीसाठी आयडीबीआय बँकेतून ९ लाख रुपये काढले. त्यांनी पैशांची पिशवी मोटरसायकलला बांधली. मात्र, घराजवळ पोहोचताच मागाहून आलेल्या दोन दुचाकीस्वारांनी ही पिशवी हिसकावून पळ काढला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.
पोलिसांनी कसा लावला छडा?
पोलिस निरीक्षक विकास देवरे यांनी तपास पथक तयार करून आरोपींचा शोध सुरू केला. तपासादरम्यान समोर आले की, हाच गट बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमध्ये चोरीसाठी सक्रिय होता. यानंतर परिविक्षाधीन डीवायएसपी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार, निलेश मोरे, विनोद संदानशीव आणि उज्वल म्हस्के यांनी शोधमोहीम सुरू केली.
तपासादरम्यान, मध्यप्रदेशातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी करताना हेच आरोपी सापडल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, नूतन डीवायएसपी विनायक कोते यांच्या आदेशाने पथक मध्यप्रदेशात रवाना झाले.
आरोपींची ओळख
हरदा जिल्ह्यातील कारागृहात अटकेत असलेल्या आंध्रप्रदेशातील गोड्डे टू सलमान रामुलू (५३), छल्ला प्रभुदास रमेश (३१), पेटला शरेसकुमार संपथकुमार (३२) आणि डी भावेश मोहनधुरू (२०) या चौघांची चौकशी केली असता त्यांनी अमळनेर, बुलढाणा, खरगोन (मध्यप्रदेश) आणि नंदुरबारमध्ये भरदिवसा चोऱ्या केल्याची कबुली दिली.
आरोपींच्या अटकेमुळे आणखी गुन्हे उघडण्याची शक्यता
सध्या चारही आरोपींना अमळनेर पोलीस ठाण्यात अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.