वेश्या व्यवसाय बंद करण्याच्या वादातून दोन गटात हाणामारी..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर: गांधलीपुरा भागात वेश्या व्यवसाय बंद करण्याच्या याचिकेवरून आणि हप्ते वसुलीच्या कारणावरून दोन गटांमध्ये २५ फेब्रुवारी रोजी रात्री १०.३० वाजता जोरदार वाद झाला. हा वाद इतका वाढला की एकमेकांविरोधात अमळनेर पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
◾ पहिली तक्रार: फिर्यादी आकिब अली सैय्यद यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचकंदील चौकात उभे असताना माजी नगरसेवक सलीम शेख उर्फ सलीम टोपी आणि त्यांच्या साथीदारांनी त्यांना शिवीगाळ करत धमक्या दिल्या. तसेच, त्यांच्या काकांनी वेश्या व्यवसाय बंद करण्यासाठी टाकलेली याचिका मागे घेण्याचा दबाव टाकला. याचिकेमुळे हप्ते बंद झाल्याने संतप्त झालेल्या गटाने आकिब अली यांना मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता रात्री ११ वाजता त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या आई व काकूला देखील शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. यासंदर्भात ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
⛔ दुसरी तक्रार: नाजमीन शेख अशपाक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रात्री १०.३० वाजता घरी असताना कुदरत अली, आकिब अली, दानिश अली, फिरोज शेख, युसुफ अली आणि रियाज मौलाना यांनी त्यांच्या घरासमोर येऊन वाद घातला. काहींनी घरात घुसून शिवीगाळ केली आणि सलीम टोपी यांच्यावर वेश्या व्यवसायातून हप्ते घेण्याचा आरोप केला. यानंतर त्याच गटाने सलीम टोपी यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना मारहाण केली. या प्रकरणी ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय राजु जाधव करीत आहेत.