तिरंगा चौक दवाखान्यात कर्मचारी नियुक्ती व शहरातील स्वच्छतेसाठी उपाययोजना करण्याची मागणी…

24 प्राईम न्यूज 27 Feb 2025
तिरंगा चौक नंदीरोड येथील महानगरपालिकेच्या दवाखान्यात कर्मचारी नियुक्त करावे तसेच शहरातील स्वच्छतेच्या उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
महानगरपालिकेचे सूतिकागृह असलेल्या या दवाखान्यात रात्रीच्या वेळी सुरक्षारक्षक नसल्याने तो बंद अवस्थेत असतो. वास्तविक, सूतिकागृह असल्याने ते 24 तास सुरू राहणे आवश्यक आहे. त्यामुळे या ठिकाणी तातडीने कर्मचारी नियुक्त करण्याची गरज आहे.
तसेच, 80 फुटी रोडवरील काझी प्लॉट येथील गटार नियमित साफसफाई न झाल्याने वारंवार तुंबते. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर येऊन परिसरात दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय, या भागातील नाल्यात मोठ्या प्रमाणावर कचरा साचल्याने त्याची जेसीबीद्वारे साफसफाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
येत्या 2 मार्चपासून पवित्र रमजान महिना सुरू होत असल्याने संपूर्ण शहरात पाणीपुरवठा, वीज व्यवस्था, कचरा उचलण्याची गाडी आणि नाल्यांची सफाई यांची विशेष काळजी घ्यावी, अशीही मागणी केली जात आहे. प्रभाग क्रमांक 12 आणि 13 मधील रोजंदारी सफाई कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाल्याने या भागात अधिक कर्मचारी नेमण्याची आवश्यकता असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.