किसान विद्यालय जानवे येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा…

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर, 28 फेब्रुवारी 2025 – किसान माध्यमिक विद्यालय, जानवे येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. प्रख्यात वैज्ञानिक डॉ. सी. व्ही. रामन यांनी “रामन प्रभाव” या महत्त्वपूर्ण शोधाच्या स्मरणार्थ हा दिवस विज्ञानप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरतो.
कार्यक्रमाला विद्यालयाचे स्थानिक चेअरमन आबासो विलास पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विज्ञान प्रदर्शनाचे कौतुक करून निवडक विद्यार्थ्यांना बक्षिसे प्रदान केली. आपल्या प्रेरणादायी भाषणातून त्यांनी विज्ञानाचे महत्त्व व त्याचा जीवनातील उपयोग स्पष्ट केला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. एस. एस. बोरसे, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विज्ञान शिक्षक श्री. मनोज माळी व श्री. देशमुख सर यांचे मोलाचे योगदान लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. ए. यू. विसावे सर यांनी आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली.