रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई होणार. – महिला आयोग…

24 प्राईम न्यूज 3 मार्च 2025. जळगावमधील मुक्ताई यात्रेत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह अन्य काही मुलींची टवाळखोरांनी छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणावर आता महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी कठोर भूमिका घेतली आहे.
रूपाली चाकणकर म्हणाल्या, “या प्रकरणाकडे मी स्वतः लक्ष ठेवत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींना ताब्यात घेतले आहे. या टवाळखोरांवर कठोर कारवाई केली जाईल. समाजातील अशी विकृती नष्ट झाली पाहिजे. यापूर्वीही या आरोपींवर गुन्हे दाखल आहेत, त्यामुळे त्यांचे चेहरे लोकांसमोर यायलाच हवेत. केवळ निषेध नोंदवून चालणार नाही, त्यांना कायदेशीर शिक्षा झालीच पाहिजे.”
दरम्यान, या घटनेवरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, सरकार यावर ठोस उपाययोजना करणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.