कजगाव स्थानकावर बडनेरा-नाशिक रोड स्पेशलचा थांबा – प्रवाशांची मोठी सोय. -खासदार स्मिता वाघ यांच्या प्रयत्नांना यश.

आबिद शेख/ अमळनेर -कजगाव, ता. जळगाव: कजगाव आणि परिसरातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. बडनेरा-नाशिक रोड स्पेशल (01211/01212) या रेल्वेला कजगाव स्थानकावर प्रायोगिक तत्त्वावर थांबा देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. खासदार स्मिता वाघ यांच्या प्रयत्नांना यश आले असून, या निर्णयामुळे स्थानिक प्रवाशांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.
कजगाव आणि आसपासच्या प्रवाशांकडून या थांब्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. प्रवाशांना नाशिक आणि बडनेराकडे जाण्यासाठी लांबच्या स्थानकांवर जावे लागत होते. ही समस्या लक्षात घेऊन खासदार स्मिता वाघ यांनी रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि अखेर हा थांबा मंजूर झाला.
रेल्वे प्रशासनाने लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे ठरवले असून, अधिकृत आदेश लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन त्यानुसार करावे. तसेच, रेल्वेने या निर्णयाचा व्यापक प्रचार करण्याचे निर्देश दिले आहेत.
या निर्णयामुळे व्यापारी, विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार आणि रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कजगाव स्थानकावरच गाडी उपलब्ध झाल्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि पैशांची बचत होणार आहे. स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, खासदार स्मिता वाघ आणि रेल्वे प्रशासनाचे आभार मानले आहेत.
रेल्वे मंत्रालयाने या थांब्याचा नियमित पुनरावलोकन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.