पाडळसरे धरणाच्या कामाला वेग देण्याची मागणी; निधी पूर्ण खर्च करण्याचे आवाहन..

आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर: पावसाळ्यापूर्वी पाडळसरे धरणाचे काम वेगाने पूर्ण करून शासनाने दिलेला निधी पूर्णपणे खर्च करावा, अशी मागणी पाडळसरे धरण जनआंदोलन समितीने केली आहे. निम्न तापी प्रकल्पाशी संबंधित उप अभियंता व अधिकाऱ्यांनी धरणाच्या कामाची पाहणी करताना समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ही मागणी केली.
समितीने स्पष्ट केले की पाडळसरे धरणासाठी मिळालेला निधी केवळ याच धरणावर खर्च झाला पाहिजे. तसेच, हा प्रकल्प अवर्षणग्रस्त पट्ट्यात येत असल्याने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत तातडीने समाविष्ट करण्याची मागणीही करण्यात आली. यासाठी समिती आंदोलनाच्या तयारीत असल्याचे समितीचे प्रमुख सुभाष चौधरी, रणजित शिंदे, महेश पाटील, रविंद्र पाटील, सुनील पाटील, अजयसिंग पाटील, डॉ. संजय पवार यांनी सांगितले.
निम्न तापी प्रकल्पाचे उप अभियंता हितेश भटूरकर यांनी पुनर्वसन, धरणाचे बांधकाम, उपसा सिंचन योजना, मातीकाम यासह तांत्रिक बाबींबाबत माहिती दिली. तसेच, जुलै अखेरपर्यंत निधी खर्च करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगितले. धरण समितीचे पदाधिकारी आणि स्थानिक नेत्यांनी प्रत्यक्ष बांधकाम स्थळी भेट देऊन सुरू असलेल्या आणि नियोजित कामांची पाहणी केली.