अमळनेर शहरात चहा-कॉफीच्या कागदी कपांवर त्वरित बंदी; आदेशाचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या दिनांक 4 मार्च 2025 रोजीच्या आदेशानुसार, चहा आणि कॉफी पिण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कागदी कपांवर अमळनेर शहरात त्वरित बंदी घालण्यात आली आहे. हे कप कॅन्सरसारख्या घातक आजारांना कारणीभूत ठरू शकतात, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्याधिकारी, अमळनेर नगरपरिषद यांनी सर्व नागरिक, व्यापारी, आस्थापना, संस्था आणि कार्यालयांना सूचित केले आहे की, या आदेशाचे तंतोतंत पालन करावे. जर कोणीही कागदी कपांचा वापर करताना आढळले, तर संबंधितांवर प्लास्टिक बंदी अधिनियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल.
नगरपरिषदेने नागरिकांना पर्यावरणपूरक आणि आरोग्यासाठी सुरक्षित पर्यायांचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे. व्यापाऱ्यांनी देखील या नियमांचे पालन करावे, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल.