टाकरखेडा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा – ९ जणांवर गुन्हा दाखल, ३.४६ लाखांचा मुद्देमाल जप्त

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर अमळनेर पोलिसांनी मोठी कारवाई करत छापा टाकला. यावेळी ९ आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर जुगार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी १ लाख २६ हजार ९६० रुपये रोख आणि ५ मोटारसायकली व १ रिक्षासह एकूण ३ लाख ४६ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
परिविक्षाधीन डीवायएसपी केदार बारबोले यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. टाकरखेडा येथे मोठ्या प्रमाणावर पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ही मोहिम राबवली. पोलिस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, एएसआय राजेंद्र कोठावदे, हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार, विनोद संदानशीव, निलेश मोरे, उज्वलकुमार म्हस्के, गणेश पाटील, अमोल पाटील, सचिन पाटील, राहुल पाटील, उदय बोरसे यांच्या पथकाने टाकरखेडा येथे छापा टाकून ही कारवाई केली.
पोलिसांनी समाधान धर्मा पाटील यांच्या शेतशिवारात शनिमंदिराजवळ जुगार खेळताना प्रकाश भगवान महाजन (धरणगाव), भाईदास सोनू लोणे (अमळनेर), रमेश आत्माराम महाजन (धरणगाव), बापू जगन्नाथ पाटील (पैलाड), समाधान धर्मा पाटील (टाकरखेडा), शिवलाल धर्मा पाटील (टाकरखेडा), विजय पंढरीनाथ सोनवणे (धरणगाव), शिवदास प्रकाश धनगर (धरणगाव) आणि धंनजय श्रीराम चव्हाण (अमळनेर) यांना ताब्यात घेतले.
अनेक वर्षांनंतर मोठ्या प्रमाणावर जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील करीत आहेत.