विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा: शैक्षणिक प्रमाणपत्रांसाठी लागणारे ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ..

24 प्राईम न्यूज 6 मार्च 2025. -राज्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रमाणपत्रांसाठी भरणे लागणारे ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली.
पूर्वी हे शुल्क १०० रुपये होते, मात्र वाढीव शुल्कामुळे विद्यार्थी आणि पालकांवर आर्थिक ताण येणार होता. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
यामुळे जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र तसेच राष्ट्रीयत्व प्रमाणपत्रांसाठी मुद्रांक शुल्क द्यावे लागणार नाही. महसूल विभागाच्या सर्व आवश्यक प्रमाणपत्रांवर ही सवलत लागू होणार आहे.
राज्यभरातील लाखो विद्यार्थी आणि पालकांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार असून, त्याची तत्काळ अंमलबजावणी केली जाईल, असेही मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.