हिंगोली रेल रोको आंदोलनासाठी संविधान आर्मीचे आवाहन..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर महाबोधी बुद्ध विहार मुक्त करण्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया संविधान आर्मी व अन्य 10 संघटनांच्या वतीने प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
संविधान आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात नुकतेच आक्रोश तिरंगा रेल रोको आंदोलन पार पडले. आता दिनांक 10 मार्च 2025 रोजी दुपारी 2 वाजता हिंगोली रेल्वे स्टेशनवर हे आंदोलन पुन्हा होणार आहे.
संविधान आर्मीचे जळगाव जिल्हा अध्यक्ष सुभाष दादा आगळे यांनी जनतेला या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या आंदोलनामध्ये महाबोधी बुद्ध विहार भारतीय बौद्ध समाजाच्या ताब्यात द्या, दादर चैत्यभूमीचे नामांतर करा, ईव्हीएम हटवा आणि बॅलेट पेपर लागू करा या प्रमुख मागण्यांसह विविध सामाजिक अन्यायाविरोधात आवाज उठवला जाणार आहे.
अमळनेर येथे संविधान आर्मी व 10 संघटनांच्या संयुक्त वतीने प्रांत अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावेळी संविधान आर्मी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुनंदाताई पानपाटील, वकील आघाडी प्रमुख ऍड. शिवकुमार ससाने, जिल्हा महामंत्री ऍड. आनंद बिर्हाडे, तालुका अध्यक्ष नारायण मैराळे, धनगर आघाडी तालुकाध्यक्ष भिका दादा धनगर, शहराध्यक्ष दुर्गेश पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
संविधान आर्मीच्या वतीने हिंगोली येथे होणाऱ्या या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.