महिला पोलीस पाटलांचे दातृत्व: स्वखर्चाने बसवले सीसीटीव्ही कॅमेरे..

आबिद शेख/अमळनेर
फापोरे, ता. अमळनेर – गावाच्या सुरक्षिततेसाठी आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवत फापोरे बुद्रुक येथील पोलीस पाटील सौ. अश्विनी दिनेश पाटील यांनी महिला दिनाचे औचित्य साधून स्वखर्चाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवून एक आदर्श निर्माण केला आहे.
गावातील सुरक्षेच्या दृष्टीने बस स्टॉप चौक व उमा महेश्वर मंदिर चौकात हे कॅमेरे बसवण्यात आले आहेत. शहरांसह ग्रामीण भागातही चोरी, गैरप्रकार वाढत असल्याने सीसीटीव्हीमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसेल आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
सौ. अश्विनी पाटील या माजी उपसरपंच दिनेश वसंतराव पाटील यांच्या पत्नी असून त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. गावाच्या सुरक्षिततेसाठी उचललेले हे पाऊल इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.