गांधीनगर परिसराने घेतला मोकळा श्वास: अमळनेरात ५० अतिक्रमणांवर कारवाई..

आबिद शेख | अमळनेर
अमळनेर शहरातील बसस्थानक शेजारील गांधीनगर परिसरातील ५० अतिक्रमणधारकांवर नगरपालिकेने कठोर पाऊल उचलत सोमवारी (१० मार्च) कारवाई केली. तगड्या पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवण्यात आले.
गांधीनगर परिसरातील अनेकांनी रस्त्यावर घरे आणि दुकाने बांधल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. तसेच, शेजारी प्रशासकीय व महसूल इमारतीचे काम सुरू असल्याने पालिकेने ही कारवाई केली.
पालिकेने यापूर्वीच या रहिवाश्यांसाठी टाकरखेडा रस्त्यावर म्हाडाची घरे उपलब्ध करून दिली होती. मात्र, काहींनी जागा न सोडता ती भाड्याने देऊन व्यवसाय सुरू ठेवला होता. परिसरात सट्टा आणि अवैध धंद्यांच्या तक्रारी येत होत्या.
मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. बऱ्याच वर्षांपासून रखडलेले अतिक्रमण हटविल्यानंतर गांधीनगर परिसराने मोकळा श्वास घेतला आहे.