सोसायटीची ‘एनओसी’शिवाय वाईन शॉपला परवानगी नाही – अजित पवार..

24 प्राईम न्यूज 12 मार्च 2025
राज्यातील गृहनिर्माण सोसायट्या, शाळा, धार्मिक स्थळे आणि हॉस्पिटल्सच्या परिसरात वाईन शॉप, बिअर शॉप, बार आणि रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी संबंधित सोसायटीची ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) बंधनकारक करण्यात येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत ही घोषणा केली.
विधानसभा सदस्य महेश लांडगे आणि राहुल कुल यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली. सोसायटी परिसरात बिअर शॉप आणि दारू दुकाने सुरू झाल्यास रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, अशी माहिती सभागृहात मांडण्यात आली. त्यावर उत्तर देताना अजित पवार यांनी ही कठोर भूमिका जाहीर केली.
सर्वसामान्यांना दिलासा
नवीन मद्यविक्री परवाने देताना स्थानिक रहिवाशांचा विरोध असेल, तर मतदानाद्वारे दुकाने बंद करण्याची प्रक्रिया अधिक स्पष्ट करण्यात आली आहे. महापालिका वार्डातील एकूण मतदानाच्या ७५ टक्के मत एका बाजूने असल्यास त्यानुसार निर्णय घेतला जाईल.
राज्यात दारूबंदीच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल आणि अवैध दारू विक्री रोखण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या जातील, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.