शहरात मोठ्या प्रमाणात पाणी गळती, प्रशासनाच्या दुर्लक्षाने नागरिक संतप्त!

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर शहरातील दोन ठिकाणी गेल्या १५ दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरू असून, प्रशासन याकडे कानाडोळा करत आहे. एक गळती ग.स. सोसायटीजवळ भर रस्त्यात सुरू असून, दुसरी शहरातील मुख्य पाण्याच्या टाकीजवळ व्हॉल्व लीक झाल्याने होत आहे. नागरिक वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही.
पाणीटंचाईचा धोका वाढतोय, प्रशासन हातावर हात ठेवून बसले!
मार्च महिन्यात उन्हाची तीव्रता वाढू लागली असून, भविष्यात पाण्याचे आवर्तन टाळण्यासाठी गळती त्वरित थांबवण्याची मागणी होत आहे. नागरिकांनी वारंवार पाणीपुरवठा विभागाचे मुख्य कर्मचारी विजय विसावे यांना यासंदर्भात माहिती दिली, मात्र त्यांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही.
गेल्या वर्षी उन्हाळ्यात शहराला पाण्याचे आवर्तन घ्यावे लागले होते, तर यंदा पाणी पातळी आणखी घटली आहे. भविष्यात गंभीर टंचाई निर्माण होण्याची शक्यता असूनही प्रशासन उपाययोजना करत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.
पालिका प्रशासनाने तातडीने कारवाई करून पाणी गळती थांबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.