शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा – वांधा समितीच्या निर्णयानंतर अन्यायकारक कपातींवर बंदी..

0

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर (दि. १२ मार्च २०२५): शेतकऱ्यांना लुटणाऱ्या अव्यवहार्य पद्धतींवर आळा बसणार आहे. गावरानी जागल्या सेना कार्यकारिणी सदस्य श्री. रमेश व्यंकट पाटील यांनी २७ मे २०२३ रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने सहाय्यक निबंधक, अमळनेर यांनी ४ जुलै २०२४ रोजी आदेश पारित केला होता. या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर ५ मार्च २०२५ रोजी एक महत्त्वाची बैठक पार पडली.

या बैठकीत वांधा समिती सदस्य, गावरानी जागल्या सेना संघटनेचे अध्यक्ष, तक्रारदार शेतकरी, बाजार समिती सचिव आणि सहसचिव यांनी सहभाग घेतला. बैठकीत खालील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले:

  1. शेतकऱ्यांकडून प्लेट काट्यावरील तोलाई शुल्क आकारले जाणार नाही.
  2. शेतमालाच्या लिलावप्रसंगी वजन कपात, ओलसर मालाच्या नावाखाली दर कपात किंवा कोणत्याही प्रकारच्या अन्यायकारक कपातींवर बंदी.
  3. लिलावानंतर खरेदीदार व्यापाऱ्यास संपूर्ण शेतमाल दिलेल्या दराने मोजणे बंधनकारक.
  4. शेतकऱ्यांना जबरदस्तीने व्यापाऱ्यांच्या गोडाऊनपर्यंत माल पोहोचविण्यास सांगितले जाणार नाही.
  5. प्रति क्विंटल वाहतूक खर्च (रु. ४०/-), प्लेट काटा तोलाई शुल्क (रु. ५०/-) आणि वराईपोटी कपात (रु. १२०/-) अशा सर्व कपातीची भरपाई शेतकऱ्यांना मिळणार.

वांधा समितीच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांवरील अन्यायकारक आर्थिक भार कमी होणार असून त्यांना अधिक पारदर्शक व्यवहाराचा लाभ मिळेल. गावरानी जागल्या सेनेने सर्व संचालक मंडळ, खरेदीदार व्यापारी, आडतदार आणि सहाय्यक निबंधकांचे आभार मानले आहेत.

शेतकऱ्यांना महत्त्वाची सूचना

शासनाने जाहीर केलेला किमान आधारभूत दर (MSP) मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी F.A.Q. / Non F.A.Q. मूल्यांकन अहवाल बाजार समितीतील अधिकृत प्रयोगशाळेतून प्राप्त करावा. तसेच, शेतमालाच्या मोजणीपूर्वी कोणत्याही अन्यायकारक प्रकरणाची तक्रार कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव, सहसचिव किंवा उपसचिव यांच्याकडे करावी. या तक्रारींचे निवारण २४ तासांच्या आत करण्यात येणार आहे.

सत्यशोधक विश्वासराव विठाबाई भास्करराव पाटील (संस्थापक अध्यक्ष) यांनी सर्व माध्यम प्रतिनिधींना या निर्णयाची माहिती प्रसारित करण्याचे आवाहन केले आहे जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा मिळू शकेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!