जळगाव लोकसभा क्षेत्रात नवोदय विद्यालय स्थापनेसाठी खासदार स्मिता वाघ यांची आग्रही मागणी..

आबिद शेख/ अमळनेर
जळगाव लोकसभा क्षेत्रातील ग्रामीण विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी मिळावी, यासाठी खासदार स्मिता वाघ यांनी लोकसभेत नियम 377 अंतर्गत नवोदय विद्यालय स्थापनेची मागणी केली.
खासदार वाघ यांनी जळगाव जिल्ह्यातील शैक्षणिक गरजांवर भर देत सांगितले की, नवोदय विद्यालये गुणवंत ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे महत्त्वाचे साधन ठरतात. आधुनिक व दर्जेदार शिक्षणासोबतच ही विद्यालये सांस्कृतिक, नैतिक आणि साहसी उपक्रमांना प्रोत्साहन देतात, त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. मात्र, जळगाव लोकसभा क्षेत्रात अद्याप एकही नवोदय विद्यालय नाही, ही मोठी शैक्षणिक असमानता आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.
जळगाव जिल्हा देशातील मोठ्या जिल्ह्यांपैकी एक असून, दोन लोकसभा क्षेत्रांमध्ये विभागला आहे. मात्र, जळगाव लोकसभा क्षेत्रातील ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी नवोदय विद्यालयाची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे या भागातील अनेक प्रतिभावान विद्यार्थी दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहतात.
“ग्रामीण विद्यार्थ्यांना उत्तम शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी जळगाव लोकसभा क्षेत्रात नवोदय विद्यालय स्थापन करावे,” अशी आग्रही मागणी करत केंद्र सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, असे स्मिता वाघ यांनी आवाहन केले.
त्यांच्या या मागणीमुळे जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी नवीन शैक्षणिक संधींचे दरवाजे खुलण्याची शक्यता आहे. आता केंद्र सरकार यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.