निवृत्त मुख्याध्यापिका प्रमोदिनी पाटील यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षिका आणि समुपदेशक पुरस्कार..

आबिद शेख/ अमळनेर
दिल्ली येथे भव्य सोहळ्यात सन्मान | पाच जिल्ह्यांमधून एकमेव मानकरी

अमळनेर (प्रतिनिधी) – प्रताप हायस्कूलच्या निवृत्त मुख्याध्यापिका प्रमोदिनी बळीराम पाटील यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षिका व समुपदेशक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दिल्लीतील नॅशनल अचीवर रिकगनायझेशन फोरम टीम, झेनित इंटरनॅशनल आणि इंडियन गॅलेक्सी फाउंडेशन यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महिला दिनानिमित्त 9 मार्च रोजी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदन येथे भव्य पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, माजी राज्यपाल कमलताई गवई, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर, तसेच खासदार बलवंत वानखेडे यांच्या हस्ते प्रमोदिनी पाटील यांना सन्मानित करण्यात आले.
सदर पुरस्कारासाठी पाच जिल्ह्यांमधून केवळ प्रमोदिनी पाटील यांची निवड झाली. याआधीही त्यांना महावीर आंतरराष्ट्रीय फाउंडेशन, नाशिक तर्फे आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या राष्ट्रीय स्तरावरील उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा बहुमान देण्यात आला.
प्रमोदिनी पाटील : एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व
शैक्षणिक योग्यता: बीएससी, बीएड, एमएड, एमए (फिलॉसॉफी), डिप्लोमा इन व्होकेशनल गायडन्स.
1990 पासून अमळनेर तालुक्यातील प्रताप हायस्कूल आणि पूज्य साने गुरुजींच्या कर्मभूमीत शिक्षिका म्हणून कार्यरत. नंतर मुख्याध्यापिका म्हणून पदभार सांभाळला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक, करिअर मार्गदर्शन आणि स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले.
पंचवीस वर्षांपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ, नाशिक विभागाच्या समुपदेशक म्हणून कार्यरत.
जिल्हा समुपदेशक समिती सदस्य, शिक्षक प्रशिक्षण तज्ञ मार्गदर्शक म्हणून योगदान.
शेकडो विद्यार्थ्यांना मानसशास्त्रीय कसोट्यांवर आधारित व्यवसाय मार्गदर्शन.
विविध जिल्ह्यांमध्ये को-ऑर्डिनेटर म्हणून शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन.
दरवर्षी आर्थिक दुर्बल कुटुंबातील किमान तीन विद्यार्थ्यांचे दत्तक शिक्षण.
कोविड काळात शिक्षक व मुख्याध्यापकांसाठी परीक्षेच्या तणावावर समुपदेशन.
“आधुनिक सिंधुताई सपकाळ” अशी उपाधी मिळवलेल्या प्रमोदिनी पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक नवीन दिशा दिली आहे. त्यांच्या या भरीव योगदानाबद्दल समाजात त्यांचे विशेष कौतुक होत आहे.