ठाकरे बंधू एकत्र येणार? गुढीपाडव्याला ‘बंधू मिलन’ कार्यक्रमाची मोठी घोषणा..

24 प्राईम न्यूज 14 मार्च 2025
मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे. लढणारी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) या दोन्ही पक्षांचे प्रमुख – उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे – एकत्र येण्याच्या शक्यतेने मराठी माणसांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर, ‘मराठी सेना’ने पुढाकार घेत गुढीपाडव्याच्या दिवशी ‘ठाकरे बंधू मिलन’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा ऐतिहासिक सोहळा ३० मार्च २०२५ रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज मैदान, मुंबई येथे पार पडणार आहे.
यापूर्वीही ‘मराठी सेना’ने दादरमधील सेना भवन परिसरात “राज आणि उद्धव ठाकरे एकत्र या” अशा आशयाचे बॅनर लावून जनतेच्या भावना अधोरेखित केल्या होत्या. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर बंधू मिलन निमंत्रण पत्रिका ठेवण्यात आली.
निमंत्रण पत्रिकेचा खास मजकूर:
“भाऊ माझा आधार, माझ्या ध्येयाचा किनारा, आयुष्याच्या प्रत्येक सुख-दुःखाचा सोबती, भाऊ माझ्या जीवनाचा आधार.”
ही पत्रिका ठेवून राजकीय बंधुता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. मराठी माणसाच्या हितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, ही काळाची गरज असल्याचे या निमंत्रणात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
मराठी जनतेला आता ३० मार्चची प्रतीक्षा आहे – हा बंधू मिलन कार्यक्रम खरंच उद्धव आणि राज ठाकरेंना एकत्र आणणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे!