नागपुरात दोन गटांत तणाव; दगडफेक, पोलिसांवर हल्ला..

24 प्राईम न्यूज 18 मार्च 2025
नागपूर: शहरातील महाल भागात दोन धार्मिक गटांमध्ये उसळलेल्या तणावामुळे हिंसक संघर्ष झाला. घोषणाबाजी सुरू होताच परिस्थिती चिघळली आणि एका गटाने पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या. या घटनेत पोलीस उपायुक्तांसह चार जण जखमी झाले आहेत.
संध्याकाळी सातच्या सुमारास मोठ्या संख्येने जमलेला जमाव शिवाजी चौकाजवळ घोषणाबाजी करत होता. दुपारी झालेल्या विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनावर रोष असल्याने हा जमाव आक्रमक झाला. त्याला प्रत्युत्तर देत दुसऱ्या गटानेही घोषणाबाजी सुरू केली, त्यामुळे वातावरण अधिक तणावपूर्ण बनले.
दरम्यान, संतप्त जमावाने एका क्रेनला आग लावली आणि पोलिसांवर दगडफेक सुरू केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरकरांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.